
कोंडेतड पुलावर नदीपात्रात चिकनची घाण टाकताना व्यावसायिक रंगेहात पकडला
राजापूर : शहरातील कोंडेतड पुलावरून नदीपात्रात चिकन व्यवसायातील घाण टाकली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. नदीपात्रात चिकनची घाण टाकताना एका चिकन व्यावसायिकाला नगरसेवक दिलीप चव्हाण, दिलीप अमरे तसेच नगरपरिषदेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव व महेश रहाटे यांनी रंगेहात पकडले. यावेळी प्रशासनाला संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याची सूचना करण्यात आली.
कोंडेतड पुलावरून गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रात चिकन व्यवसायातील घाण टाकली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत होत्या. या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होण्याबरोबरच नदीपात्राचे प्रदूषण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, शहरातील पवित्र पुंडलिक मंदिर परिसरातही अशाच प्रकारे चिकनची घाण साठवली जात असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे.
धार्मिक व सार्वजनिक महत्त्व असलेल्या परिसरात अशा प्रकारे कचरा व घाण टाकणे ही गंभीर बाब असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नदीपात्र तसेच मंदिर परिसरात घाण टाकणाऱ्यांवर नगरपरिषद प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
‘पुन्हा अशी चूक करण्याचे धाडस होऊ नये, यासाठी संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात यावी,’ अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




