८ वर्षीय बालकावरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला जन्मठेप


चिपळूण- आठ वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चिपळूण येथील विशेष न्यायालयाने आरोपी फईम अब्दुल्ला तांबे (वय ३२, रा. चिपळूण) याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि ₹१० हजार दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षाही न्यायालयाने सुनावली.

सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, जानेवारी २०१९ मध्ये आरोपीने आठ वर्षीय मुलाला फूस लावून निर्जन ठिकाणी नेले आणि त्याच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार केला. तसेच ही घटना कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुलाच्या मित्राने ही बाब नातेवाईकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमे तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास पूर्ण केला आणि दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने १२ साक्षीदार तपासले. पीडित बालक आणि त्याच्या मित्रांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. प्रफुल्ल रामचंद्र साळवी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक बी. आय. नाईकवाडे यांनी केला, तर प्रकरणाचे पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण यांनी काम पाहिले.

विशेष न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी पुरावे आणि साक्षींचा विचार करून आरोपीला भारतीय दंड संहितेतील कलम ३६३, ३७७, ५०६ तसेच POCSO कायद्यातील कलम ४ व ६ अंतर्गत दोषी ठरवले. न्यायालयाने अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून अशा प्रकरणांत कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या निकालामुळे पीडित बालकाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलांच्या संरक्षणाबाबत कठोर कायदेशीर कारवाईचा स्पष्ट संदेश समाजात गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button