हॉटेल बिलात ‘सेवा शुल्क’ लावणे बेकायदेशीर! ४१ रेस्टॉरंट्सवर मोठी कारवाई; तुमच्याकडून घेतल्यास अशी करा तक्रार!

CCPA Restaurant Service Charge Rules : अनेकदा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर बिलामधील ‘सेवा शुल्क’ पाहून आपल्याला धक्का बसतो. मात्र, यापुढे हॉटेल चालकांच्या या मनमानीला चाप लागणार आहे.

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणा’ने (CCPA) याबाबत कडक पाऊलं उचलली असून देशातील तब्बल ४१ मोठ्या रेस्टॉरंट्सवर स्वतःहून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने १९ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ‘नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन’कडे ग्राहकांनी पुराव्यांसह केलेल्या तक्रारींनंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल आणि ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची कारवाई

यापूर्वी अनेक हॉटेल्सनी सेवा शुल्कच्या नियमांना न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, २८ मार्च २०२५ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की “सेवा शुल्क अनिवार्यपणे आकारणे हे कायद्याच्या विरोधात आहे” आणि स्पष्ट केले की रेस्टॉरंट्सनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच, कायद्यानुसार त्यांची अंमलबजावणी करण्यास CCPA मोकळे आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. या निकालानंतर ‘सीसीपीए’ने या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

कारवाईच्या कचाट्यात ‘चायोज’सह अनेक नामवंत हॉटेल्स!

‘सीसीपीए’ने केवळ नोटीस न बजावता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सना मोठा आर्थिक दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांच्या बिलात परस्पर सर्व्हिस चार्ज जोडल्याबद्दल ‘चायोज’ या प्रसिद्ध कंपनीला ५०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच संबंधित ग्राहकाकडून घेतलेला सर्व्हिस चार्ज व्याजदरासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. ‘चायोज’ला त्यांच्या देशातील सर्व शाखांमधील कॉम्प्युटर बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये तात्काळ बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय कॅफे ब्लू बॉटल (पटना), चायना गेट रेस्टॉरंट, फिएस्टा बार्बेक्यू नेशन, ‘फू’, लॉपेरा फ्रेंच बेकरी आणि झोरो द लक्झरी नाईट क्लब यांसारख्या अनेक मोठ्या ब्रँड्सविरुद्ध अंतिम आदेश जारी करण्यात आले आहेत.

बिलात सेवा शुल्क दिसल्यास काय करावे?

  • बिलात सेवा शुल्क दिसल्यास हॉटेल व्यवस्थापनास तो बिलातून काढून टाकण्यास सांगा.
  • जर हॉटेल व्यवस्थापनाने चार्ज हटवण्यास नकार दिला, तर तो चार्ज लावलेले अधिकृत बिल ताब्यात घ्या आणि त्याचा स्पष्ट फोटो किंवा डिजिटल कॉपी जपून ठेवा.
  • तुम्ही राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या १९१५ या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून थेट तक्रार नोंदवू शकता.
  • ग्राहकांच्या सोयीसाठी उपलब्ध असलेल्या एनसीएचच्या अधिकृत वेब पोर्टल किंवा मोबाईल अ‍ॅपवर बिलाचा फोटो जोडून तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता.
  • ग्राहकांकडून टिप किंवा सेवा शुल्क वसूल करणे हा हॉटेल्सचा कायदेशीर अधिकार नाही. अनेकदा ग्राहक कुठं वाद घालता असं म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, यापुढे ग्राहकांना तक्रार करता येणार आहे.
  • ग्राहकांनीही सजग राहून बिलातील ‘टॅक्स’ आणि ‘चार्ज’ यांमधील फरक ओळखणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button