
स्कायवॉकच्या आर्ट गॅलरी कामासाठी दिवसाही रस्ता बंद; वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त
रत्नागिरी : शहरातील माळनाका येथील स्कायवॉकवरील आर्ट गॅलरीच्या कामासाठी मंगळवारी दुपारच्या सुमारास मारुती मंदिर ते माळनाका हा मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पर्यायी मार्गावरही वाहनांची मोठी गर्दी झाल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
स्कायवॉकवरील आर्ट गॅलरीचे काम वेगाने सुरू असून, काम पूर्ण करण्यासाठी काही काळ वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला. दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी मारुती मंदिर ते माळनाका हा मार्ग बंद करून वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममार्गे थिबा पॅलेसकडे वळवली. अचानक झालेल्या या बदलामुळे मारुती मंदिर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि शहरातील वाहतूक विस्कळीत झाली.
यापूर्वी स्कायवॉकच्या कामाचा आढावा घेताना पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काम शक्यतो रात्रीच्या वेळेत करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही दिवसा मुख्य रस्ता बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकारामुळे वाहतूक नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित होत असून, भविष्यात अशा कामांसाठी अधिक प्रभावी समन्वय साधून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.




