
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची सायकल वारी उत्साहात
दोन दिवसांत ३३० किमी प्रवास : ३० हून अधिक जणांचा सहभाग
रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सलग तिसऱ्या वर्षी आयोजित रत्नागिरी ते पंढरपूर सायकलवारी सुफळ संपूर्ण झाली. रत्नागिरीतील श्री विठ्ठल मंदिर येथून सुरू झालेली ही वारी पंढरपूरला विठुरायाच्या चरणी वंदन करून समाप्त झाली. वारीत क्लबच्या ३० हून अधिक सायकलपटूंनी भाग घेतला तर कुटुंबातील २० सदस्यांनीही या वारीत भाग घेऊन भक्ती शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.
पहिल्या दिवशी वारीचा मुक्काम उंब्रज (भोसलेवाडी) येथे झाला. दुसऱ्या दिवशी उंब्रज ते पंढरपूर हा प्रवास करण्यात आला. शेनवडी येथील घोडके कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी सायकल वारकऱ्यांसाठी दुसऱ्या दिवशी धपाटे, दही, उसळ, ठेचा असा खात बेत ठेवला होता. संध्याकाळी पंढरपुरात पोहोचल्यावर विठुरायाचे मुखदर्शन घेतल्यानंतर सर्व सायकल वारकरी धन्य झाले. त्याच दिवशी संध्याकाळी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सदस्य गायिका सौ. मुग्धा भट-सामंत यांनी गायनसेवा सादर केली. या दरम्यान ९० दिवसांच्या सायकलिंग चॅलेंजमध्ये यशस्वी झाल्याबद्दल रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व सदस्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रभरातून आलेल्या चार हजारांहून अधिक सायकल वारकऱ्यांनी गोल रिंगण केले. हा सोहळा अतिशय अविस्मरणीय झाला.
वारीसंदर्भात अनुभव सांगताना योगेश मोरे म्हणाले की, ऑफिसमधील पूर्वनियोजित कामं आणि जबाबदाऱ्या यामुळे वारीला जायचे निश्चित नव्हते पण मन वारीकडे ओढ घेत होतं. वारी म्हणजे केवळ पंढरपूर गाठणे नव्हे, तर प्रत्येक पेडलसोबत विठ्ठल नामाचा जप करत स्वतःला शोधण्याचा प्रवास ठरला. अवघड अशा वाटणाऱ्या आंबा घाटातून मार्ग काढत घाट सर केला. माथ्यावर पोहोचताच मनावरील ताण एका क्षणात दूर झाला. पहिल्या दिवशी उंब्रज, भोसलेवाडी येथे श्री गोपाळनाथ मंदिरात ग्रामस्थ, बालवारकरी, पत्रकार आणि मान्यवरांनी सायकल वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत केले. टाळ-मृदुंगाच्या गजरात सत्कार केला. आम्ही सर्वांनी टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर आमचे पाय मोकळे करून मनोसक्त नाचलो.
ज्ञानेश्वर पांडे म्हणाले की, अविस्मरणीय सोहळा, अद्भुत अनुभती आणि अद्वितीय समाधान मिळवून देणारी रत्नागिरी ते पंढरपूर सायकल वारी. मलकापूर नजीक रस्त्यावर चिखल अंगावर उडला, सायकलही माखली. जवळच असणाऱ्या वॉशिंग सेंटरवर आम्ही सर्वांनी सायकल आणि सर्व सायकलस्वारांनी स्वतःलाही आंघोळ घालून घेतली. पैसे किती झाले असे विचारले असता तर त्या दादाने हात जोडून नमस्कार केला आणि मन भारावून गेले. त्यांच्या रूपाने जागोजागी विठुमाऊली भेटली.
अमित जोशी यांनी सांगितले की, रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबच्या सायकलवारीमध्ये सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं. ३३० कि.मी. चा हा प्रवास फक्त अंतर पार करण्याचा नव्हता; श्रद्धा, मैत्री, जिद्द, सहकार्य आणि विठ्ठलाच्या कृपेचा अनुभव देणारा प्रवास होता. मी प्रथमच पंढरपूरला गेलो. पायी नव्हे… गाडीने नव्हे… तर सायकलच्या दोन चाकांवरून त्याच्या भेटीला यावं, अशीच पांडुरंगाची इच्छा असावी. त्यामुळे ही वारी माझ्यासाठी केवळ सायकलिंग नव्हती; ती माझ्या आयुष्यातील पहिली पंढरीची भेट होती. प्रवासात प्रसाद देवस्थळी यांनी सहज बोलता बोलता एक सुंदर गोष्ट सांगितली. आपल्याकडे प्लॅन ए आहे आणि प्लॅन बी सुद्धा सुद्धा आहे. प्लॅन ए म्हणजे सायकल चालवत पंढरपूर गाठायचं व प्लॅन बी म्हणजे विठोबा. पंढरपूरपर्यंत पोहोचवणारा खरा सारथी विठुरायाच होता.
योगेश सामंत म्हणाले की, हातखंब्यापर्यंत आम्हाला निरोप देण्यासाठी आलेल्या सर्व सायकलिस्ट मित्रांनी या वारीत वेगळेच चैतन्य निर्माण केले. मनात एकच ध्यास होता पांडुरंगाच्या भेटीचा! वाटेत एका शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांनी केलेले स्वागत मनाला स्पर्शून गेले. पुढे घरच्यांसारखे केलेले आदरातिथ्य अविस्मरणीय. विठुरायाच्या नगरीत प्रवेश करताना शरीराचा सर्व थकवा क्षणात विरून गेला. विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी माथा टेकला आणि मन भरून आले. वारी संपली तरी मनातील विठ्ठलभक्तीची वारी मात्र अखंड सुरूच राहणार आहे.
प्रसाद खेडेकर म्हणाले की, विठुरायाच्या कृपेनेच ही वारी सुफळ संपूर्ण झाली. मन भरून आलंय, खरंच शब्द अपुरे पडत आहेत. कोरोनानंतर श्वासाचा त्रास अशा अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. परंतु या वारीत प्रत्येक सहकाऱ्याने दिलेला विश्वास, केलेली मदत आणि वेळोवेळी दिलेला एकच शब्द “तू सहज पूर्ण करशील!” हा मोठा आधार ठरला. दोन दिवस फक्त भक्ती, आनंद, समाधान आणि विठ्ठलनामाचा गजर केला.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सायकल वारकरी
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, उपाध्यक्ष दर्शन जाधव, खजिनदार योगेश मोरे, कार्यकारिणी सदस्य प्रसाद देवस्थळी, विशाल भोसले, ओंकार फडके, तसेच योगेश सामंत, प्रसाद खेडेकर, राकेश होरंबे, वरद चुनेकर, अमित पोटफोडे, अक्षय पोटफोडे, विकास कांबळे, नारायण पाटोळे, गजानन भातडे, ज्ञानेश्वर पांडे, मृणाल वाडेकर, पूजा कोसुंबकर, विनायक पावसकर, किरण चुंबाळकर, अमित जोशी, तृणाल येरूणकर, निलेश शाह, मंगेश शिंदे, राहुल भोसले, अथर्व शेंड्ये, संतोष तावडे, विनायक कुऱ्हाडे, तेजस ढवळे आणि ॲड. सचिन नाचणकर. या वारीत १७ वर्षांची पूजा कोसुंबकर व ७४ वर्षांचे गजानन भातडे यांनीही सहभाग घेत वारी यशस्वी केली.




