
रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूला लगाम, सहा महिन्यात अवघे ८ रूग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असली, तरी आरोग्य विभागाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात केवळ ८ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनने जोरदार पुनरागमन केले असून, सलग चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूसह इतर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवली आहे.




