
मोरवंडेजवळ भाजी वाहतूक करणारा टेम्पो दरीत कोसळला; चालकासह सहकारी बचावले
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड तालुक्यातील मोरवंडे गावाजवळ रविवारी (दि. २६) मध्यरात्रीनंतर भाजीपाला वाहून नेणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो सुमारे ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळला. मात्र, चालक आणि त्याच्यासोबत असलेला सहकारी या दोघांनाही या अपघातातून सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
माहितीनुसार, कराड येथून दापोलीकडे भाजीपाला घेऊन निघालेला टेम्पो रविवारी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मोरवंडे परिसरातून जात असताना अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे टेम्पो रस्त्यालगतच्या खोल दरीत जाऊन कोसळला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या अपघातात चालक व त्याचा सहकारी किरकोळ जखमी झाले




