
मंगळवारीही कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. काही भागात चोवीस तासात ६०० मिमीहून तर बहुतांश भागात ३०० मिमीहून अधिक पावसाची नोंद सोमवारी झाली.दरम्यान, मंगळवारीही कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या दरम्यान ताशी ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहतील अशी शक्यताही हवामान वर्तवली आहे.
सध्या दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपाटीपर्यत ‘ऑफ शोअर ट्रफ’ म्हणजे कमी दाबाचा लांब पट्टा पसरला आहे. तसेच समुद्रसपाटीपासून ३.१ ते ७.६ किमी उंचीदरम्यान ‘विंड शिअर झोन’ म्हणजे ज्या भागात वाऱ्यांचा वेग किंवा दिशा अचानक बदलते असा पट्टा कायम आहे. या बदलामुळे हवा वरच्या दिशेने उचलली जाऊन ढगांची निर्मिती होते आणि त्यामुळे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वाढते.




