पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सात हजार पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध
रत्नागिरी : राज्य सरकारच्या २ जून २०२६ च्या शासन निर्णयानुसार अमलात आलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी २४ जुलै रोजी अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये जिल्ह्यातील एकूण ७,०७८ पात्र शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांकांचा समावेश असून, संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने आपले आधार प्रमाणीकरण (e-KYC) पूर्ण करावे, असे जाहीर आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जमुक्ती, एकवेळ तडजोड योजना (OTS) आणि नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ अशा विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जापैकी ३१ मार्च २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या कर्जदारांना कमाल २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे थकबाकी पीक कर्ज २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी एकवेळ तडजोड योजना लागू करण्यात आली असून, अशा शेतकऱ्यांनी २ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेली रक्कम स्वतःच्या हिश्ष्याने बँकेत जमा केल्यास उर्वरित २ लाखांचा लाभ मिळण्यासाठी मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत देण्यात आली आहे.
याशिवाय, सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ यापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करून विहीत मुदतीत किंवा नियमानुसार ३० जून २०२६ पूर्वी पूर्ण परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जात आहे. अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम, तर ५० हजार रुपयांपेक्षा कमी कर्ज रक्कम असल्यास प्रत्यक्ष परतफेड केलेल्या रक्कमेइतका (किमान ५ हजार रुपये) लाभ मिळणार आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत या पोर्टलवर एकूण १२०६२ कर्ज खाती अपलोड करण्यात आली असून, त्यापैकी ७०७८ खाती विशिष्ट क्रमांकासह पात्र ठरली आहेत. तर ३००२ खात्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असून ४०७६ खात्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरणासाठी ‘बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन’ (अंगठ्याची नोंदणी) लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतर मिळणाऱ्या पावतीमध्ये कर्जमुक्तीच्या रकमेची माहिती स्पष्ट होईल आणि ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या कर्जाच्या लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ‘डीबीटी’ (DBT) द्वारे जमा केली जाईल.
या योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी बँक शाखा अधिकारी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव, तालुका सहाय्यक निबंधक कार्यालये आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा येथे विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. तसेच प्रसिद्ध यादीतील थकीत रकमेत तफावत असल्यास किंवा कर्जमुक्तीच्या रकमेबाबत अथवा इतर तपशीलाबाबत काही तक्रार असल्यास, शेतकऱ्यांसाठी पोर्टलवर तक्रार नोंदणीची (Grievance) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरीय (TLC) व जिल्हास्तरीय (DLC) समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामासाठी संबंधित बँकांमार्फत पुन्हा नवे पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




