खेड शहरात दुसऱ्यांदा पुराचा कहर; जगबुडी नदीची पाणीपातळी ११ मीटरवर, बाजारपेठेत पुन्हा पाणी

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पुराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून खेड शहरात दुसऱ्यांदा पुराचे पाणी शिरले आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जगबुडी नदीची पाणीपातळी तब्बल ११ मीटरपर्यंत पोहोचली आहे. नदीची इशारा पातळी ५ मीटर, तर धोका पातळी ७ मीटर असून सध्या नदी धोक्याच्या पातळीपेक्षा खूप वरून वाहत आहे.
सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली. त्यानंतर अवघ्या तासाभरात म्हणजे सायंकाळी ७ वाजेपर्यंत जगबुडी नदीची पाणीपातळी १०.५० मीटरवर पोहोचली आणि पुराचे पाणी मटण मार्केट मार्गे शहरातील पौत्रिक मोहल्ला तसेच मुख्य बाजारपेठेत शिरले. त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांची पुन्हा एकदा धावपळ उडाली.


दरम्यान, नारंगी नदीलाही पूर आला असून नाना नाणी पार्क परिसरातील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच सुसेरी येथील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने पन्हाळजे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरानंतर नागरिक आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या मेहनतीने घरे व दुकाने स्वच्छ केली होती. मात्र पुन्हा एकदा पुराचे पाणी शहरात घुसल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले असून नागरिकांनी प्रशासनाकडे प्रभावी उपाययोजनांची मागणी करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button