
कोतळूक येथे बंद घरातील अजगराला जीवदान
आबलोली येथील सर्पमित्र जय काजरोळकर यांची कामगिरी
गुहागर : तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील बलवंत गोडबोले यांच्या बंद घरात बाथरूममध्ये असलेल्या अजगराला आबलोली येथील सर्पमित्र जय काजरोळकर यांनी सुरक्षित पकडून जीवदान दिले. सर्पमित्र जय काजरोळकर याच्या या कामगिरीबद्दल कौतुक करण्यात येत आहे.
आज (५ जुलै) सकाळी कोतळूक येथील बंद असलेल्या या घरात साफसफाई करताना घर उघडले असताना सौ. दीपाली सचिन ओक यांना हा अजगर निदर्शनास आल्यानंतर तात्काळ वनविभाग व सर्पमित्र आबलोली येथील जय काजरोळकर यांना संपर्क साधला. जय काजरोळकर यांनी तातडीने त्या ठिकाणी जात १० ते १२ फूट लांब साधारण १४ ते १५ किलो वजनाचा जिवंत अजगर सुरक्षितपणे कोणतीही इजा न करता पकडून जीवदान दिले.
जय काजरोळकर यांना समीर ओक, संजय बाधावटे, सुनिल भेकरे, पराग नार्वेकर, मंदार गुहागरकर, प्रकाश नार्वेकर,अनू आरेकर, सौरभ आरेकर यांनी सहकार्य केले.




