आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांनी घेतली आ. किरण सामंत यांची भेट;

'पूर्वीप्रमाणेच बाजार सुरळीत सुरू राहील' आ. सामंत यांची ग्वाही



राजापूर : शहरातील आठवडा बाजारात शिवाजीपथ मार्गावरील बंदरधक्का ते वैशंपायन गुरुजी पुलापर्यंत व्यापाऱ्यांना बसण्यास नगर परिषद प्रशासनाने प्रतिबंध घातल्याच्या पार्श्वभूमीवर आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी आमदार किरण सामंत यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांनी निवेदन सादर करून संबंधित परिसरात पूर्वीप्रमाणे व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली.
यावर आमदार सामंत यांनी या प्रश्नात लक्ष घालून योग्य तोडगा काढला जाईल. पूर्वीप्रमाणेच आठवडा बाजार सुरळीत सुरू राहील, अशी ग्वाही व्यापाऱ्यांना दिली.
राजापूर शहरातील शिवाजीपथ मार्गावर आठवडा बाजाराच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी, नागरिक व वाहनचालकांच्या तक्रारी तसेच काही व्यापाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने बंदरधक्का ते वैशंपायन गुरुजी पुलापर्यंत व्यापाऱ्यांना बसण्यास प्रतिबंध केला आहे.
या निर्णयानंतर व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने यापूर्वी नगराध्यक्षा अॅड. हुस्नबानू खलिफे यांची भेट घेतली होती. त्यावेळी नगराध्यक्षा खलिफे यांनी नगर परिषदेच्या पुढील सभेत या विषयावर चर्चा करून व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही, अशा पद्धतीने आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
त्यानंतर शनिवारी व्यापाऱ्यांनी आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. व्यापाऱ्यांच्या मागण्या ऐकून आमदार सामंत यांनी प्रशासनाशी चर्चा करून सर्वांना मान्य होईल असा मार्ग काढण्यात येईल तसेच पूर्वीप्रमाणेच आठवडा बाजार सुरळीत सुरू राहील, अशी ग्वाही दिली.
यावेळी शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button