
केवळ साखर वाढणे म्हणजे मधुमेह नव्हे; ३५ वर्षांवरील सर्वांनी काळजी घेणे गरजेचे: मधुमेहतज्ञ डॉ. वरुण दामले
चिपळूण : “मधुमेह हा एक ‘सायलेंट किलर’ (शरीराला पोखरत जाणारा) आजार आहे. त्याची लक्षणे सुरुवातीला सहज दिसून येत नाहीत, मात्र त्याचा आघात माणसाच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या कोणत्याही अवयवावर होऊ शकतो. केवळ रक्तातील साखर वाढणे म्हणजेच मधुमेह नव्हे, तर त्यामुळे ज्यांचे वय ३५ वर्षांच्या पुढे आहे, किंवा अती भूक लागणे, अती तहान लागणे, लघवी होणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसत आहेत. त्यांनी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी व आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे,” अशी माहिती डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर रुग्णालयात नुकतेच दाखल झालेले विख्यात मधुमेह तज्ञ डॉ. वरुण दामले यांनी दिली.
डॉ. दामले यांनी पुणे येथून एम.बी.बी.एस. पूर्ण केले असून, त्यांनी मधुमेह या आजारावर विशेष प्राविण्य (स्पेशलायझेशन) मिळवले आहे. भारताचे प्रख्यात मधुमेह तज्ञ डॉ. विश्वनाथ मोहन(मधुमेहावरील संशोधन याकरता २०११ मध्ये पद्मश्री) (ज्यांनी १९४८ साली चेन्नई येथे देशातील पहिले डायबेटिक युनिट स्थापन केले) यांचे सुपुत्र डॉ. मोहन यांच्याकडे डॉ. दामले यांनी मधुमेहाचे उच्च शिक्षण व धडे गिरवले आहेत. डॉ. दामले आता डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दर आठवड्याला रुग्णांच्या सेवेसाठी उपस्थित राहणार आहेत.
लक्षणे नसली तरी धोका संभवतो
आपले मत मांडताना डॉ. दामले म्हणाले की, “अनेक रुग्णांमध्ये मधुमेहाची कोणतीही बाह्य लक्षणे दिसत नाहीत, परंतु त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी वाढलेली असते. जर या आजाराचे वेळीच आणि लवकर निदान झाले, तर त्यावर सहज नियंत्रण मिळवता येते. ज्या नागरिकांना हाय ब्लड प्रेशर (उच्च रक्तदाब), कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा किंवा वारंवार यूरिन इन्फेक्शन (मूत्रमार्गाचा संसर्ग) होण्याचा त्रास आहे, त्यांनी तातडीने आपली आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे.” मधुमेहासाठी आवश्यक तपासणी पायाच्या नसाची, डोळ्यातील पडदा , बॉडी कॉम्पोसिशन आणि चरबीचे प्रमाण तपासणे, अशा डोक्यापासून पायापर्यंत सर्व यंत्रणा तपासणी वालावलकर रुग्णालयात करण्यात येते.
‘मधुसागर’ प्रकल्पातून ६०० रुग्णांची तपासणी!
बी.के.एल. वालावलकर रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून ‘मधुसागर’ ह्या डॉ. सौ. सुवर्णा पाटील यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत मधुमेह रुग्णांची वेळोवेळी मोफत व सवलतीच्या दरात तपासणी केली जात आहे. या विशेष प्रकल्पांतर्गत रुग्णालयाने आत्तापर्यंत ६०० हून अधिक रुग्णांची यशस्वी तपासणी केली आहे. यामध्ये चिपळूण तालुक्यासह संगमेश्वर, राजापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील असंख्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. मधुमेहतज्ञ डॉ. वरूण दामले हे दर महिन्याच्या तिसऱ्या आठवडाभर पूर्णवेळ ओ.पी.डी मध्ये उपलब्ध असणार आहेत.




