
अभिजीत दिपके यांच्या संसदेवरील मोर्चाला परवानगी नाही, नियम मोडल्यास. दिल्ली पोलिसांचा गंभीर इशारा
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 20 जूनपासून नीट पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलेले आहे. अशातच आता दिपके यांनी 20 जुलै रोजी संसद चलो मोर्चाचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे.यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी जंतर-मंतर येथे जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी अशा कोणत्याही मोर्चासाठी ना परवानगी मागण्यात आली आहे, ना ती देण्यात आली आहे अशी माहिती दिली आहे. त्यामुळे या मोर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मोर्चाला परवानगी नाही…
सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. मोर्चापूर्वी दिल्ली पोलिसांनी सार्वजनिक सूचना जारी करत स्पष्ट इशारा दिला आहे की, परवानगीशिवाय मोर्चात सहभागी होणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दिपके यांच्यासह आंदोलकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.




