
पाच वर्षांनंतर गुरुनाथ डोंगळे यांची स्वावलंबनाकडे वाटचाल!
आर एच पी फाउंडेशनतर्फे निओमोशन इलेक्ट्रॉनिक गाडी; सादिक नाकाडे सरांच्या प्रयत्नांतून मिळाली स्वावलंबनाची नवी उमेद
मात्तिवडे, ता. निपाणी : आयुष्यातील एखादी अनपेक्षित घटना संपूर्ण जीवनप्रवास बदलून टाकते. मात्र, आपुलकीची साथ, योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास नव्याने आयुष्य जगण्याचा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. गुरुनाथ भिकाजी डोंगळे यांचा प्रवास याचे प्रेरणादायी उदाहरण आहे.
गुरुनाथ डोंगळे (वय ३५) हे मात्तिवडे, ता. निपाणी, जि. बेळगाव येथील रहिवासी आहेत. दहावीनंतर ते वडिलांना शेतीकामात मदत करत होते. २०१४ मध्ये नीलम यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांना स्वरा आणि राजवीर ही दोन मुले झाली. २०२२ मध्ये आंबे काढण्यासाठी झाडावर चढले असता तोल जाऊन ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. मानेपासून खालच्या भागाच्या संवेदना गेल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठे बदल झाले आणि अनेक कामांसाठी त्यांना इतरांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागले.
या कठीण प्रवासात पत्नी नीलम यांनी त्यांना मोलाची साथ दिली. डॉक्टरांकडून व्यायाम शिकून त्या दररोज तीन वेळा त्यांचा व्यायाम करून घेतात. २०२४ मध्ये हेल्पर्स ऑफ द हॅण्डिकॅप, कोल्हापूर संस्थेच्या सिंधुदुर्ग येथील स्वप्ननगरी प्रकल्पात दोन महिने पुनर्वसनासाठी राहिल्यानंतर गुरुनाथ यांना पहिल्यांदा व्हीलचेअरचा आधार मिळाला. त्यामुळे त्यांना खोलीबाहेर पडणे, लोकांमध्ये मिसळणे आणि स्वतःच्या हाताने जेवणे शक्य झाले. या अनुभवातून त्यांच्या आत्मविश्वासाला नवी चालना मिळाली.
स्वप्ननगरी येथे त्यांची ओळख आर एच पी फाउंडेशन, रत्नागिरीचे अध्यक्ष सादिक नाकाडे सर यांच्याशी झाली. घरी परतल्यानंतर गुरुनाथ यांचे बाहेर जाणे कमी झाल्याचे लक्षात आल्यावर नाकाडे सरांनी त्यांना आठ दिवसांसाठी आपल्या फार्महाऊसवर बोलावले. तेथे त्यांनी गुरुनाथ यांना निओमोशन इलेक्ट्रॉनिक गाडी चालवण्यास प्रोत्साहित केले. सरावाने गाडी चालवण्याचा आत्मविश्वास मिळाल्यानंतर एका दात्याच्या सहकार्याने आर एच पी फाउंडेशनतर्फे गुरुनाथ यांना निओमोशन इलेक्ट्रॉनिक गाडी उपलब्ध करून देण्यात आली. ही गाडी आणण्यासाठी सादिक नाकाडे सर स्वतः गोव्याला गेले.
आज गुरुनाथ या गाडीच्या साहाय्याने स्वतः घराबाहेर पडतात, गावात फिरतात आणि मित्रांच्या भेटी घेतात. अनेक वर्षांनंतर स्वतःच्या इच्छेने बाहेर जाणे आणि मित्रांमध्ये मिसळणे यांचा आनंद त्यांना अनुभवता येत आहे. या स्वातंत्र्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असून भविष्यात अर्थार्जन करून कुटुंबाला हातभार लावण्याची त्यांची इच्छा आहे.
गुरुनाथ यांच्या या प्रवासात पत्नी नीलम यांची साथ, सादिक नाकाडे सरांचे प्रोत्साहन आणि आर एच पी फाउंडेशनतर्फे मिळालेली मदत महत्त्वाची ठरली आहे. गुरुनाथ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे सरांचे मनापासून आभार मानले आहेत.
स्वावलंबनाची संधी, सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि स्वतःच्या क्षमतेनुसार पुढे जाण्याचे बळ प्रत्येक व्यक्तीला मिळायला हवे. गुरुनाथ डोंगळे यांची वाटचाल हेच अधोरेखित करते. योग्य साथ आणि संधी मिळाल्यास जीवनात नवे मार्ग खुलू शकतात, याची त्यांची कहाणी प्रेरणादायी आठवण करून देते.




