अण्णा हजारेंबाबत प्रश्न विचारताच अभिजित दीपकेचं उत्तर; “म्हाताऱ्या माणसांनी निवृत्त होऊन आश्रमात बसावं”


काॅक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. सोशल मीडियावर त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी ही चळवळ सुरु केली. त्यानंतर नीट पेपरफुटीविरोधात आवाज उठवला. आता याच अभिजीत दीपकेंना तुम्ही अण्णा हजारेंची भेट घेणार का? या चळवळीचा भाग त्यांना करुन घेणार आहात का? असं विचारलं असता म्हाताऱ्या माणसांनी निवृत्त व्हावं आश्रमात जावं असं म्हणत अण्णा हजारेंवर टीका केली आहे.

नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधताना अभिजीत दीपके यांना माध्यम प्रतिनिधींनी त्यांना ‘तुम्ही अण्णा हजारे यांची भेट घेणार का?’ असा थेट प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना दीपके यांनी आपण अण्णा हजारे किंवा इतर कोणाचीही भेट घेणार नसल्याचं स्पष्ट केलं.

अण्णा हजारेंबाबत काय म्हणाले अभिजीत दीपके?

आपली भूमिका स्पष्ट करताना अभिजीत दीपके म्हणाले की, “ज्यांचे वय ६० ते ७० वर्षांपेक्षा जास्त झाले आहे, अशा लोकांनी आता स्वतःहून सर्व सामाजिक आणि राजकीय चळवळींमधून निवृत्त झाले पाहिजे. हा प्रश्न थेट देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे आम्ही काय करायचं आणि आमचं भविष्य कसं घडवायचं, हे सर्वस्वी आम्हाला म्हणजेच तरुणांना ठरवू द्या. ज्या म्हाताऱ्या लोकांचं सर्व काही झालं आहे त्यांनी आता निवृत्त होऊन आश्रमात विश्रांती घ्यावी. त्यांनी उगाचच तरुणांच्या भवितव्याचे निर्णय घेऊ नये.” अशा शब्दांत अण्णा हजारेंबाबत अभिजीत दीपकेंनी भूमिका मांडली आहे. अभिजीत दीपकेंच्या या विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं नाकारता येत नाहीत.

कॉक्रोच जनता पार्टीला तरुणांकडून उत्तम प्रतिसाद

मागील महिन्यात देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका प्रकरणात बेरोजगार तरुणांची तुलना उपरोधाने ‘कॉक्रोच’ म्हणजेच झुरळाशी केली होती. सरन्यायाधीशांच्या याच विधानाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि त्यावर उपरोधात्मक टीका करण्यासाठी सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी नावाचे एक डिजिटल हँडल सुरू करण्यात आलं होतं, या डिजिटल चळवळीला तरुणांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या चळवळीच्या माध्यमातून तरुणांच्या बेरोजगारीच्या मुद्द्याला थेट हात घातल्यामुळे अवघ्या चार दिवसांतच या डिजिटल हँडलचे फॉलोअर्स देशातील भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांपेक्षाही अधिक झाले. सोशल मीडियावरील या डिजिटल चळवळीला देशभरातील तरुणांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळाल्याने, आता या चळवळीने प्रत्यक्ष राजकीय आणि सामाजिक आंदोलनाचे रूप घेतले आहे, मात्र अण्णा हजारेंबाबत प्रश्न विचारला असता म्हाताऱ्या माणसांनी आश्रमात गेलं पाहिजे असं परखड मत अभिजीत दीपकेंनी व्यक्त केलं आहे. या वक्तव्याचे पडसाद कसे उमटणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button