
सुवर्णपदक विजेत्या तन्वी रेडीजचे चिपळुणात जल्लोषात स्वागत; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

चिपळूण : गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत चिपळूणच्या तन्वी रेडीज हिने सुवर्णपदक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. ५५ हून अधिक देशांच्या स्पर्धकांचा सहभाग असलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत तन्वीने उत्कृष्ट सादरीकरण करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्पर्धेनंतर तन्वी रेल्वेने चिपळूण येथे दाखल होताच तिच्या स्वागतासाठी नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, क्रीडाप्रेमी आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. रेल्वे स्थानक परिसरात फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी आणि घोषणाबाजी करत तिचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सुवर्णपदक विजेत्या तन्वीच्या आगमनाने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यानंतर नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने तन्वीची शहरातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. हातात तिरंगा आणि अभिनंदनाचे फलक घेऊन अनेकांनी तन्वीच्या यशाचा गौरव केला. मिरवणुकीदरम्यान “भारत माता की जय”, “तन्वी रेडीजचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
तन्वी सध्या नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. महाविद्यालयात बीएससीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. शैक्षणिक प्रगतीबरोबरच योगासन क्षेत्रातही तिने सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीमागे कठोर परिश्रम, नियमित सराव आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य माधव बापट, प्रशिक्षक रणवीर सावंत, महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच तन्वीचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी तन्वीचा सत्कार करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तन्वी रेडीज हिने जागतिक स्तरावर मिळवलेल्या या यशामुळे चिपळूण शहरासह संपूर्ण कोकणाचा गौरव वाढला असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशामुळे योगासन क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींना नवी प्रेरणा मिळाली आहे.



