
साखरोळी येथे मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचा तपास वेगात

खेड : तालुक्यातील साखरोळी गावाच्या हद्दीत रविवारी (२१ जून) सायंकाळी मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. साखरोळी येथील पेट्रोल पंपाच्या पुढे असलेल्या वळणाजवळ हा सांगाडा आढळून आला असून घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अवशेष ताब्यात घेतले.
प्राथमिक माहितीनुसार, सांगाड्याजवळ बनियन आणि ट्रॅक पॅन्ट आढळून आल्याने हे अवशेष पुरुष व्यक्तीचे असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र याबाबतचा अंतिम निष्कर्ष वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपासणीसाठी हे अवशेष कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, हा प्रकार घातपाताचा आहे की अन्य काही कारणामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सर्व शक्यता गृहित धरून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक विवेक अहिरे आणि पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरत असून खेड, दापोली आणि परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. ओळख पटविण्यासाठी काही नागरिकही पोलिसांशी संपर्क साधत असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक विवेक अहिरे म्हणाले, “खेड, दापोली आणि परिसरातील मिसिंग व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. ओळख पटविण्यासाठी काही लोक येत आहेत. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत असून आवश्यकता भासल्यास संबंधित अवशेषांची डीएनए चाचणी करण्याची तयारी देखील ठेवली आहे.”
दरम्यान, या घटनेमुळे साखरोळी परिसरात चर्चांना उधाण आले असून पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणामागील नेमके वास्तव समोर येणार आहे.




