“सरकारी नोकर आहात, संघाचे स्वयंसेवक नाही”; RSS ची स्तुती केल्याने IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांवर काँग्रेसची टीका!

: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केल्याचा आरोप करत आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर काँग्रेसने टीका केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून नांगरे पाटील यांचा एक व्हिडीओ काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत नांगरे-पाटील संघावर बोलताना दिसत असून, ‘समाजात द्वेष पसरवणाऱ्या संघाची जाहीर स्तुती करणारे…हे कसले कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी?’, अशी टीका काँग्रेसने नांगरे- पाटील यांच्यावर केली.

हिंदू संमेलनात बोलतानाचा व्हिडीओ शेअर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने विश्वास नांगरे पाटील हिंदू संमेलन २०२६ कार्यक्रमात बोलत असतानाचा व्हिडीओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन शेअर केला आहे. व्हिडीओत नांगरे पाटील भाषणात आरएसएस आणि हेगडेवार यांचा उल्लेख करताना दिसत आहेत. यावरुन काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. ‘एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन, जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जाहीर स्तुती करणार…हे कसले कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी?’, अशी टीका काँग्रेसने केली.

नांगरे पाटील यांना संघाचा इतिहास माहिती नाही का? – काँग्रेस

नांगरे पाटील यांना संघाचा इतिहास माहिती नाही का? असेही काँग्रेसने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. पोलिसांचे काम समाजात कायदा व्यवस्था राखणे आहे, की अशा विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांचे गुणगान गाणे? संघाच्या लोकांनी दंगली घडवल्या हा इतिहास यांना माहिती नाही की काय?’, असा सवालही काँग्रेसने पोस्टमधून उपस्थित केला.

संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले,
राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले!

एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन, जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) जाहीर स्तुती करणार…हे कसले… pic.twitter.com/fQntu0KUNs

— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 24, 2026

सरकारी नोकर आहात, संघाचे स्वयंसेवक नाही – काँग्रेस

विश्वास नांगरे पाटील यांच्या अलिकडील नागपूरमध्ये झालेल्या बदलीवरुन देखील काँग्रेसने टीका केली आहे. ‘आता या महाशयांची बदली नागपूरला झाली आहे. बरं झालं, ज्यांची सेवा करायची आहे, आता थेट त्यांच्याच चरणी जाऊन सेवा करण्याची संधी यांना मिळाली आहे’, असे टीकास्त्र काँग्रेसने सोडले. ‘पण लक्षात ठेवा, तुम्ही जनतेच्या पैशावर पगार घेणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात, देशद्रोही संघाचे स्वयंसेवक नाही. वर्दीचा गैरवापर करून जर राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबवणार असाल, तर नागपूर आणि महाराष्ट्राची संविधानप्रेमी जनता हे खपवून घेणार नाही’, असा इशाराही काँग्रेसने पोस्टमधून दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button