रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू


राजापूर तालुक्यातील कोतापूर फाटा परिसरातील एका रिसॉर्टमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेत सहा वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे साखरी-नाटे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हसन सलमान कोतवडकर (वय ६ वर्षे, रा. साखरी-नाटे) हा आपल्या कुटुंबीयांसोबत कोतापूर फाटा परिसरातील एका रिसॉर्टमध्ये फिरण्यासाठी गेला होता. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास तो स्विमिंग पूल परिसरात खेळत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पूलमध्ये बुडाला.

काही वेळानंतर ही बाब उपस्थितांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने हसनला पाण्याबाहेर काढून त्याच्या जीवासाठी प्रयत्न केले. त्यानंतर त्याला उपचारासाठी धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, खेळण्याबागडण्याच्या वयातच चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. घटनेची नोंद संबंधित यंत्रणांकडे करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button