
राजकारणातून थोडी उसंत; मंत्री आदिती तटकरे यांची रायगडच्या जंगलात पक्षीनिरीक्षणाची भटकंती
महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यस्त राजकीय आणि प्रशासकीय कामकाजातून वेळ काढत रायगडच्या हिरव्यागार अरण्यात निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. शनिवारी त्यांनी म्हसळा तालुक्यातील निसर्गरम्य वनक्षेत्राला भेट देत पक्षीनिरीक्षणाची विशेष सफर केली.
या निसर्गभ्रमंतीत त्यांच्यासोबत प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार Shantanu Kuveskar उपस्थित होते. जंगलातील जैवविविधतेचा जवळून अनुभव घेताना आदिती तटकरे यांनी विविध दुर्मिळ आणि आकर्षक पक्ष्यांचे निरीक्षण केले.
भ्रमंतीदरम्यान रायगडच्या जंगलांचे वैभव मानल्या जाणाऱ्या (महाधनेश) पक्ष्याविषयी त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. या पक्ष्याचा अधिवास, प्रजननकाळ, जीवनचक्र आणि पर्यावरणीय महत्त्व याबाबत त्यांनी उत्सुकतेने माहिती घेतली. याशिवाय नवरंग, काळटोप हळद्या, पाचू कवडा, मधुबाज, शमा आणि गव्हाणी घुबड यांसारख्या विविध पक्ष्यांचेही त्यांनी निरीक्षण केले.
निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेल्या या क्षणांमध्ये आदिती तटकरे यांनी पक्ष्यांचे मनोहारी क्षण कॅमेऱ्यात टिपत रायगडच्या समृद्ध जैवविविधतेचे कौतुक केले. त्यांच्या या भेटीमुळे वनसंवर्धन आणि पक्षीसंवर्धनाबाबत जनजागृती होण्यासही हातभार लागणार असल्याचे मानले जात आहे.




