
रत्नागिरीचे अन्न व औषध प्रशासनाकडून रत्नागिरीत ६० हॉटेल्सवर छापे; अनेक हॉटेल्सना नोटीस
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची धुरा तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. याचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यातही उमटू लागले आहेत.मुंढे यांच्या कडक आदेशानंतर रत्नागिरीचे अन्न व औषध प्रशासनाकडून अवैध गुटखामाफिया आणि नियमबाह्य हॉटेल चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आठ ठिकाणी छापे टाकून सहा लाखांचा गुटखा जप्त केला असून, ६० हॉटेलची झडती घेण्यात आली. त्यातील चार जणांना सुधारणा करण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत.जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकदेखील प्रशासनाच्या रडारवर आली आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जिल्ह्यातील ६० हॉटेल्सची अनपेक्षित तपासणी केली. यामध्ये स्वच्छतेचे आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार हॉटेलमालकांना तातडीने सुधारणा नोटीस दिली आहे. इतर तीन प्रकरणांमध्ये तडजोड शुल्क म्हणून २४ हजार रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला आहे.




