
महाविकास आघाडीमध्ये बिघाडी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!
ठाणे : महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. या निवडणुकीतही त्यांच्यामध्ये गटबाजी, मतभेद समोर आले. त्यांच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी माघार घेतली. तर महायुती मजबूतीने यशाची वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने महाराष्ट्राला पाठबळ देण्याचे काम करत आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ठाणे -पालघर स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र फाटक बिनविरोध निवडून आल्यानंतर शुक्रवारी टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जल्लोष करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दिवंगत वसंत डावखरे यांना बिनविरोध निवडून देण्याचे काम आम्ही केले होते. या निवडणुकीत शिवसेनेचे दोन,राष्ट्रवादी काँग्रेस दोन आणि भाजपचे दोन असे सहा बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. ही पुढच्या विजयाची नांदी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
महायुतीचे सरकार निवडून आले तेव्हापासून या राज्यात विकासाची घोडदौड सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राला पाठबळ देत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा आम्ही निर्णय घेतला, विविध विकास प्रकल्पाना गती देण्याचे काम महायुती सरकार करत आहे असे शिंदे म्हणाले. नाशिक आणि जळगाव दोन्ही मतदारसंघात चर्चा सुरू असून महायुती मजबुतीने पुढे जात आहे १७ जागा निवडून आणू असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
ठाणे शहराचा समूह विकास योजनेच्या (क्लस्टर) माध्यमातून नियोजनबद्ध विकास होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व मंत्र्यांना जबाबदारी दिली असून त्याचा लेखाजोखा मी घेत असतो. प्रत्येक मंत्र्याने त्यांच्या मतदारसंघात काम केली पाहिजे आणि आपल्या खात्याला न्याय दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.




