
बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची स्पष्ट भूमिका
रत्नागिरी : शिवसेनेतून बाहेर पडलेले माजी आमदार बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पूर्णविराम दिला आहे. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.
पत्रकारांशी संवाद साधताना चव्हाण म्हणाले, “भारतीय जनता पक्षात प्रवेश करून नंतर पक्ष सोडून गेलेल्या व्यक्तींना पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही. मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत बाळ माने यांना भाजपमध्ये प्रवेश मिळणार नाही.” तसेच, पक्ष सोडून गेलेल्या इतर नेत्यांनाही आपल्या कार्यकाळात प्रवेश दिला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रविंद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे बाळ माने यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या समर्थक आणि नेत्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. भाजपमध्ये घरवापसीच्या चर्चांना यामुळे मोठा धक्का बसला आहे.
विधान परिषद निवडणुकीदरम्यान शिवसेनेकडून देण्यात आलेली अधिकृत उमेदवारी मागे घेतल्यानंतर बाळ माने यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी बाळ माने यांच्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करत ते पूर्वी भाजपचे सहकारी असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या ताज्या वक्तव्यामुळे त्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.




