बाळ माने आम्हाला परके नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :

कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरूनही ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेत महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेंद्र उर्फ बाळ माने यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “बाळ माने हे आम्हाला परके नाहीत” असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे केले असून, त्यामुळे कोकणातील भविष्यातील राजकीय घडामोडींविषयी नव्या चर्चांना उधाण आले आहे.

कोकण विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरलेले सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी भाजप नेते तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यावेळी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे, सूचक उपलब्ध होत नसल्याचे तसेच मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याने आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

यावेळी मंत्री नितेश राणे यांनीही आपली भूमिका मांडताना, “मी महायुतीचा प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहेत, त्यामुळे आज ‘सब कुछ देवा भाऊ’ अशीच परिस्थिती आहे,” असे वक्तव्य केले होते.

या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीनंतर महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. बाळ माने यांनी घेतलेली भूमिका या बिनविरोध निवडीसाठी निर्णायक ठरली होती.

दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बाळ माने यांची तत्काळ पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर मुळचे भाजपचे असलेले बाळ माने हे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार का, याकडे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाळ माने यांच्याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले. त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी “बाळ माने हे आम्हाला परके नाहीत” असे स्पष्टपणे सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे कोकणातील आगामी राजकारणात नव्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत असून, त्याचा महाविकास आघाडीला मोठा राजकीय फटका बसू शकतो, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button