बाळ मानेंच्या माघारीनंतर आरोप-प्रत्यारोप; सुनील तटकरेंकडून विनायक राऊतांना प्रत्युत्तर


रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड विधानपरिषद मतदारसंघातील निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार बाळ माने यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. अर्ज मागे घेतल्यानंतर ठाकरे गटाने बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

दरम्यान, माजी खासदार विनायक राऊत यानी बाळ माने यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला. या आरोपांमुळे कोकणातील राजकीय वातावरण तापले आहे.

राऊत यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष, सुनील तटकरे यांनी ठाकरे गटाच्या राजकीय स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, कोकणातील जनाधाराबाबत इतरांवर आरोप करण्यापूर्वी ठाकरे गटाने स्वतःच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण करावे.

तटकरे यांनी पुढे दावा केला की, एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बालेकिल्ला मानला जाणारा कोकण आता महायुतीच्या प्रभावाखाली आहे. तसेच विधानपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाकडे मर्यादित मतदारसंख्या असल्याचा उल्लेख करत त्यांनी पक्ष नेतृत्वावरही टीका केली.

बाळ मानेंच्या माघारीमुळे निर्माण झालेल्या या राजकीय वादामुळे कोकणातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button