जैतापूर–धाऊलवल्ली खाडी पुलावरील उच्च दाबाच्या वीजवाहिनीबाबत सुरक्षिततेची मागणी


राजापूर : जैतापूर–धाऊलवल्ली खाडी पुलावर सुरू असलेल्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीच्या कामाबाबत सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत ग्रामपंचायत जैतापूरचे सरपंच तथा राजापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गिरीश सखाराम करगुटकर यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सध्या उच्च दाबाची वीजवाहिनी पुलाच्या कठड्यालगत टाकण्याचे काम सुरू असून ही पद्धत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. या पुलावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक, पर्यटक आणि पादचारी ये-जा करतात. अनेकजण पुलाच्या कठड्याजवळ उभे राहून खाडीचे निसर्गरम्य दृश्य पाहतात तसेच छायाचित्रे आणि सेल्फी घेतात. त्यामुळे कठड्यालगत वीजवाहिनी असल्यास अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यापूर्वीही या कामाबाबत प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमांतून नागरिकांनी चिंता व्यक्त केली असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित वीजवाहिनी पुलाच्या कठड्यावरून न नेता पुलाच्या खालच्या बाजूने आवश्यक तांत्रिक साधनांच्या साहाय्याने सुरक्षितरीत्या टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात संभाव्य अपघाताची जबाबदारी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही गिरीश करगुटकर यांनी दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button