
पाच वर्षांनंतर उलगडले फोंडाघाटातील रहस्य;अपघात नव्हे तर खून, चार आरोपी ताब्यात
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील फोंडाघाटात डिसेंबर २०२१ मध्ये आढळून आलेल्या अज्ञात तरुणाच्या मृत्यूमागील गूढ अखेर पाच वर्षांनंतर उलगडले आहे. सुरुवातीला अपघात मानण्यात आलेली ही घटना प्रत्यक्षात आर्थिक वादातून झालेला खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
२८ डिसेंबर २०२१ रोजी फोंडाघाटातील खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह आणि त्याच्याजवळ मोटारसायकल आढळून आली होती. घाट परिसरात फिरण्यासाठी आलेल्या काही युवकांना हा मृतदेह दिसून आला होता. मृतदेहासोबत मोटारसायकलही असल्याने प्रथमदर्शनी हा रस्ते अपघात असल्याचे मानले गेले होते. त्यानुसार कणकवली पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास केला होता.
मात्र, मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ०७ ला अलीकडे मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख अश्पाक मुलाणी उर्फ निहाल (रा. माळशिरस, जि. सोलापूर) अशी पटली. त्याचा मृत्यू अपघातात नव्हे तर मित्रांनीच केलेल्या खुनामुळे झाल्याचे समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशांच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून आरोपींनी संगनमत करून अश्पाकला कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे मध्यरात्रीच्या सुमारास त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह आणि मोटारसायकल फोंडाघाटातील दरीत फेकून अपघाताचा बनाव रचण्यात आला.
या प्रकरणी मनोज भडगे, सुरेंद्र सोनवडेकर, अतिष मोरे आणि ऋतुराज शेट्टी या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्यातील इतर संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपासासाठी आरोपींना कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पाच वर्षांपूर्वी अपघात म्हणून बंद झालेल्या प्रकरणाचा उलगडा झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली असून, तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




