पत्रकार शशिकांत वारिशे हत्याकांडातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला आता खासगी रुग्णालयात उपचार करण्यास न्यायालयाची परवानगी


रत्नागिरी : पत्रकार शशिकांत वारिशे हत्याकांडातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी रत्नागिरीतील रामनाथ रुग्णालयात नेण्यास जिल्हा न्यायालयाने परवानगी दिली आहे.
सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आंबेरकर याने किडनी, पित्ताशय, प्रोस्टेट आणि मूळव्याधीसह विविध आरोग्य समस्यांचा दाखला देत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तुरुंगात असताना छातीत वेदना, चक्कर येणे, लघवीचा त्रास आणि पोटदुखी होत असल्याने तातडीच्या उपचारांची आवश्यकता असल्याचे त्याने नमूद केले होते. यापूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालय, परकार रुग्णालय आणि रामनाथ रुग्णालयात उपचार घेतल्याचा तसेच अल्पकालीन जामिनाच्या काळात मुंबईत विविध वैद्यकीय तपासण्या झाल्याचाही उल्लेख अर्जात करण्यात आला होता. मात्र या अर्जावर सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर आपली भूमिका मांडताना आरोपीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यापूर्वी शासकीय आरोग्य यंत्रणेतील उपलब्ध सुविधांचा विचार करण्यात यावा, अशी विनंती केली. तसेच आरोपीला थेट खासगी रुग्णालयात जाण्याची परवानगी दिल्यास, शासकीय रुग्णालयात सुविधा उपलब्ध असतानाही तो तेथे उपचार घेण्याचे टाळू शकतो. त्यामुळे अर्ज फेटाळण्यात यावा, अशीही विनंती करण्यात आली. प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुविधांचा वापर करण्यात यावा आणि तेथील उपचार अपुरे ठरल्यास खासगी रुग्णालयाचा पर्याय स्वीकारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. एवढेच नव्हे तर जिल्हा शल्य चिकित्सकांचे मत घेऊन संबंधित आजारांवर शासकीय रुग्णालयात उपचार होऊ शकतात की नाही, याची खातरजमा करावी, असेही तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
सरकारी पक्षानेही आरोपीने उपचारासंदर्भातील वैद्यकीय कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केलेली नसल्याचे नमूद करत संबंधित अहवाल नोंदीवर घेण्याची मागणी केली होती. तसेच तपास अधिकाऱ्यांनी मांडलेले मुद्दे आरोपीच्या अर्जावर निर्णय घेताना विचारात घ्यावेत, अशीही विनंती करण्यात आली होती. मात्र, आरोपीच्या आरोग्यविषयक तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला आवश्यकतेनुसार आरोपीला रामनाथ रुग्णालयात नेऊन तपासणी व उपचार करण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आदेशही शहर पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे.

या प्रकरणातील आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे, आरोपी आंबेरकर याला यापूर्वीही वैद्यकीय कारणास्तव सहा आठवड्यांचा अल्पकालीन जामीन मंजूर करण्यात आला होता. जानेवारी २०२६ मधील आदेशात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मानसिक तणाव यांचा उल्लेख करण्यात आला होता. अँजिओप्लास्टी झाल्याने नियमित तपासणीची गरज असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद असल्याचेही न्यायालयाने नोंदवले होते. त्या आधारे १३ जानेवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीत आरोपी जामिनावर बाहेर होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button