खेडमधील सीएनजी पंपावर गोंधळ; उद्योजकाच्या कारची तोडफोड, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह


मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी येथील सीएनजी पंपावर शनिवारी मध्यरात्री गोंधळाची घटना घडली. काही अज्ञात व्यक्तींनी एका उद्योजकाच्या कारची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे पंपावरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित उद्योजक सीएनजी भरण्यासाठी पंपावर आले असताना पिवळ्या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर टुरिस्ट कारमधून आलेल्या चार ते पाच जणांशी त्यांचा वाद झाला. यावेळी संबंधित व्यक्तींनी दादागिरी करत उद्योजकांचा मोबाईल फोन आणि कारची चावी घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर कारच्या पुढील काचेचे नुकसान करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

घटनेच्या वेळी पंपावर केवळ दोन कर्मचारी उपस्थित होते. सुरक्षा रक्षक नसल्याने परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, घटनेनंतर संबंधित उद्योजकांनी आपत्कालीन सेवा आणि खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर पोलिसांशी संपर्क झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले.

पंप व्यवस्थापनाने यापूर्वीही सुरक्षा व्यवस्था वाढविण्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे. रात्रीच्या वेळी वादविवाद, गोंधळ तसेच पैसे न देता इंधन भरून निघून जाण्याच्या घटनाही घडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कळंबणी परिसरातील मोबाईल नेटवर्क समस्येमुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे महामार्गावरील सीएनजी पंपांवरील सुरक्षा उपाययोजनांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button