चिपळूणमध्ये दुर्मिळ ‘माऊस डियर’चे दर्शन; वन्यजीवप्रेमींमध्ये आनंद


चिपळूण : चिपळूण शहरात भारतातील सर्वात लहान हरिण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्मिळ ‘माऊस डियर’ (इंडियन शेवरोटेन) या वन्यप्राण्याचे दर्शन झाल्याने नागरिक आणि वन्यजीवप्रेमींमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

डीबीजे महाविद्यालय परिसरात राहणारे बाळकृष्ण शंकर पालकर यांना त्यांच्या घरामागील कंपाउंडच्या भिंतीलगत हे दुर्मिळ हरिण लपून बसलेले दिसून आले. अत्यंत लाजाळू आणि मानवांपासून दूर राहणारा हा प्राणी सहसा दाट जंगलात वास्तव्य करतो. त्यामुळे शहर परिसरात त्याचे दर्शन होणे ही दुर्मिळ घटना मानली जात आहे.

‘माऊस डियर’ हा प्रामुख्याने निशाचर प्राणी असून रात्रीच्या वेळीच अन्नाच्या शोधात बाहेर पडतो. त्याच्या या स्वभावामुळे तो सहजपणे नजरेस पडत नाही. यापूर्वीही चिपळूणमधील कचरा मैदान परिसरात वन्यजीव अभ्यासक डॉ. विक्रम घाणेकर यांना या प्राण्याचे दर्शन झाल्याची नोंद आहे.

अलीकडील या घटनेमुळे चिपळूण परिसरातील जंगल भागात ‘माऊस डियर’चे अस्तित्व अद्याप टिकून असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. वन्यजीव अभ्यासकांच्या मते, जैवविविधतेच्या दृष्टीने हा प्राणी अत्यंत महत्त्वाचा असून त्याच्या अधिवासाचे संवर्धन आणि संरक्षण करणे आवश्यक आहे.

या दुर्मिळ प्राण्याच्या दर्शनामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात असून स्थानिकांनीही त्याला कोणताही त्रास न देता सुरक्षितपणे जंगलात परत जाण्यास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button