
गोळपमध्ये ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम
भावी कृषी पदवीधरांकडून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक गट ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सहा महिन्यांसाठी रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावात दाखल झाला आहे. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राच्या अधिपत्याखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात डॉ. के. व्ही. मालशे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विविध कृषी व उद्यानविद्याविषयक उपक्रमांची अंमलबजावणी करणार आहेत.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक उद्यानविद्या तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त असलेल्या प्रगत तंत्रांचा प्रसार करणे आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचे व शेतकऱ्यांचे अनुभव मिळवून देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यकाळात विद्यार्थी भाजीपाला व फळपिकांच्या लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान, रोपवाटिका व्यवस्थापन, संतुलित खत व पाणी व्यवस्थापन, तसेच पीक संरक्षणासाठी रोग व कीड नियंत्रणाचे आधुनिक उपाय यांची माहिती प्रात्यक्षिकांद्वारे शेतकऱ्यांना देणार आहेत.
गावातील शेतकऱ्यांनी या उपक्रमास अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या शेतकरी भेटी, मार्गदर्शन सत्रे आणि विविध जनजागृतीपर कार्यक्रमांमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण शेतीव्यवस्थेचा पायाभूत अनुभव मिळणार आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने भविष्यात उत्पादनात भर पडण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




