
कोणीतरी अकलेचे दिवे लावून सांगितली डॉक्टर कपात : पालकमंत्री उदय सामंत यांचा आ. जठार यांना टोला
कोणीतरी अकलेचे दिवे लावले आणि रत्नागिरीत डॉक्टरांची कपात असल्याचे सांगितले. पण प्रत्यक्षात अशी कोणतीही कपात झालेली नाही. उलट, रत्नागिरीतील शासकीय मेडिकल कॉलेज हे आज महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे कॉलेज म्हणून नावारूपास येत असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी म्हटले आहे. महायुतीचे सरकार इतके मोठे काम करत असताना, विरोधक असल्यासारखे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून मनोरंजन करणे हे महायुतीसाठी अत्यंत घातक असल्याचे सांगितले.
रत्नागिरीत सध्या राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. महायुतीमधील अंतर्गत मतभेद आता थेट चव्हाट्यावर आले आहेत. विकासाची कासे करणे ही महायुतीतील सर्वांची सांघिक जबाबदारी आहे. मात्र, काही लोक केवळ सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून मनोरंजन करत आहेत, अशा खरमरीत शब्दांत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांचे नाव न घेता कान टोचले आहेत.
रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयातील कथित डॉक्टर कपातीवरून जठार यांनी केलेल्या टीकेचा सामंत यांनी शनिवारी पानवल धरण लोकार्पण सोहळ्यात व्यासपीठावरून जोरदार समाचार घेतला. चांगल्या कामात खोडा घालणे हे महायुतीमधील नेत्यांचे काम नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
www.konkantoday.com




