
मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथे दोन कारची धडक; चौघे जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथील सीएनजी पंपासमोर रविवारी (९ ऑगस्ट) दुपारी दोन कारची धडक होऊन झालेल्या अपघातात चौघे जखमी झाले. दुपारी सुमारे ३.२० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रिबल कार (क्र. एमएच ०८ एएक्स ६४९६) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार प्रथम महामार्गावरील डिव्हायडरला धडकली. त्यानंतर ही कार साईडच्या लेनमध्ये गेली आणि समोरून चिपळूणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वॅगनार कारला (क्र. एमएच ४३ सीके ८८४०) जोरदार धडकली.
या अपघातात मयुरेश ढेबे, सायली शिर्के, अभिषेक शिर्के आणि मानसी प्रधान हे चौघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच चिपळूण गव्हर्मेंट रेस्ट हाऊसजवळ तैनात असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानची २४ तास अपघात सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना पुढील उपचारासाठी चिपळूण येथील लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.




