कोट्यवधी रुपये खर्चलेल्या सांस्कृतिक केंद्रात कार्यक्रमादरम्यान ‘बत्ती गुल’; नाना पाटेकरांसह उपस्थित काही काळ अंधारात

खेड : शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात आयोजित कार्यक्रमादरम्यान अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने उपस्थितांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना ही घटना घडल्याने सांस्कृतिक केंद्रातील मूलभूत सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कार्यक्रम उत्साहात सुरू असतानाच अचानक वीज गेल्याने सभागृह काही काळ अंधारात बुडाले. त्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय निर्माण झाला. या वेळी खेडच्या नगराध्यक्षा सौ. माधवी बुटाला, विविध मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक सांस्कृतिक केंद्रात पर्यायी वीज व्यवस्था प्रभावीपणे कार्यान्वित झाली नसल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली. अशा महत्त्वाच्या कार्यक्रमात वीजपुरवठा खंडित होणे ही बाब प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित करणारी असल्याचे नागरिकांचे मत आहे.
विशेषतः सांस्कृतिक केंद्रासारख्या सार्वजनिक वास्तूमध्ये जनरेटर किंवा अन्य बॅकअप यंत्रणा सक्षम असणे अपेक्षित असताना कार्यक्रमादरम्यान निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे सुविधांच्या देखभाल आणि व्यवस्थापनाबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत.
दरम्यान, या घटनेबाबत माध्यम प्रतिनिधींनी नगराध्यक्षा सौ. माधवी बुटाला यांच्याकडे प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी यावर भाष्य करण्यास टाळाटाळ केल्याचे समजते. त्यामुळे या प्रकाराबाबत अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.
कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक केंद्रात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडत असल्याची टीका नागरिकांकडून होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button