
आरे समुद्रकिनारी दुर्दैवी दुर्घटना; कोल्हापूरहून सहलीस आलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू, मित्राला जीवदान
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध आरे समुद्रकिनारी मंगळवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत कोल्हापूरहून सहलीसाठी आलेल्या एका विद्यार्थ्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर त्याच्या मित्राला स्थानिकांच्या तत्परतेमुळे सुखरूप वाचवण्यात यश आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव अतुल रघुनाथ सुतार (वय १७, रा. कोल्हापूर) असे असून, मयूर विष्णू खाडे (वय १६, रा. कोल्हापूर) याला वेळीच बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील एका खासगी शिकवणी वर्गातील ४१ विद्यार्थ्यांचा गट शिक्षकांसह आरे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास विद्यार्थी समुद्रात आंघोळीसाठी उतरले असता अतुल सुतार हा समुद्रात अधिक खोलवर गेला. त्याला परत आणण्यासाठी त्याचा मित्र मयूर खाडे त्याच्या मागे गेला. मात्र समुद्रातील पाण्याच्या तीव्र प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात अडकून बुडू लागले.
दोघेही विद्यार्थी बुडत असल्याचे लक्षात येताच इतर विद्यार्थ्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील तसेच झिप लाईनचे कर्मचारी सुरज चव्हाण, आदित्य पाटील, संस्कार साळवी, अजय मांजरेकर आणि महेश साळवी यांनी तातडीने समुद्रात धाव घेत बचावकार्य सुरू केले.
जीवाची पर्वा न करता केलेल्या प्रयत्नांमुळे दोन्ही विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. मात्र अतुल सुतार याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तर बेशुद्धावस्थेतील मयूर खाडे याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील आदेश कदम यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला वेग दिला. दरम्यान, मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली असून ते रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तसेच परिसरात शोककळा पसरली असून समुद्रकिनारी सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.




