
आरटीओच्या ‘वायुवेग’ पथकाचा धडाका; वर्षभरात ५,८१४ वाहनांवर कारवाई, ३.३३ कोटींचा दंड वसूल
रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) ‘वायुवेग’ पथकाने गेल्या आर्थिक वर्षात व्यापक कारवाई केली आहे. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत नियमभंग करणाऱ्या ५,८१४ वाहनांवर कारवाई करत तब्बल ३ कोटी ३३ लाख ४३ हजार रुपयांचा दंड आणि १८ लाख ४४ हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी आरटीओकडे सध्या पाच इंटरसेप्टर वाहने आणि अत्याधुनिक रडार यंत्रणेने सुसज्ज एक विशेष इंटरसेप्टर वाहन कार्यरत आहे. स्पीडगन, ब्रेथ अॅनालायझर आणि इतर आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने या पथकाकडून अचूक तपासणी व कारवाई केली जाते.
या वर्षभरातील कारवाईत सर्वाधिक फटका ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांना बसला. नियमांपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या ३५५ ट्रक, टिप्पर आणि ट्रेलरवर कारवाई करून १ कोटी १३ लाख ५९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही आरटीओने कडक भूमिका घेतली. ४२५ प्रवासी बस आणि ७२ खासगी वाहनांवर कारवाई करून २६.८८ लाख रुपयांचा दंड तसेच २२.७२ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला. नियमभंग करणाऱ्या ७७ रिक्षांवर कारवाई करून ३.०९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूलबसची विशेष तपासणी करण्यात आली. आवश्यक नियमांचे पालन न करणाऱ्या ५५ स्कूलबसवर कारवाई करून ३.८१ लाख रुपयांचा दंड आणि १२ हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला.
वायुवेग पथकाच्या तपासणीत विना हेल्मेट दुचाकी चालवणारे १,४३० चालक, वेगमर्यादा ओलांडणारी १,३२२ वाहने, पीयूसी नसलेली १,२८० वाहने, फिटनेस प्रमाणपत्र नसलेली १,१७६ वाहने आणि विम्याविना धावणारी १,०९७ वाहने आढळून आली. याशिवाय विनापरवाना वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, सीटबेल्ट न लावणे, ट्रिपल सीट प्रवास आणि वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल अशा विविध प्रकारच्या नियमभंगांवरही कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी ही मोहीम पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.



