अधिकमासानिमित्त पाचल येथे भव्य हरिनाम महोत्सवाचे आयोजन

राजापूर : राजापूर तालुका अखंड वारकरी सांप्रदाय, पाचल यांच्या वतीने अधिकमासानिमित्त ५ जून रोजी पाचक येथील श्री महागणपती मंदिर येथे भव्य हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व आध्यात्मिक वातावरणात संपन्न होणाऱ्या या भक्तिमय सोहळ्यास पंचक्रोशीतील वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिकमासाच्या पुण्यकाळानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाची सुरुवात सायंकाळी ४ वाजता सामूहिक गीतावाचन आणि विष्णू सहस्रनाम पठणाने होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत सामुदायिक हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ७.३० ते ९.३० या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दौलत महाराज पाटेकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून, भक्ती, नामस्मरण आणि समाजप्रबोधनाचा संदेश त्यांच्या कीर्तनातून दिला जाणार आहे. कार्यक्रमाची सांगता रात्री ९.३० वाजता महाप्रसादाने होईल.
या महोत्सवासाठी वें. ह.भ.प. सोनुबाबा कुणकेर पायी दिंडी संस्था (ता. लांजा) यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. अधिकमासानिमित्त आयोजित या हरिनाम महोत्सवातून भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि संतविचारांचा जागर करण्याचे कार्य या माध्यमातून होणार आहे.
या सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी राजापूर तालुका अखंड वारकरी सांप्रदाय, पाचल तसेच श्री महागणपती उत्सव मंडळ, पाचल यांनी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button