
जि. प. शाळांमध्ये पुन्हा भरणार अंगणवाड्या, शिक्षण विभागाचा निर्णय
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत राज्यातील शिक्षण व्यवस्थेत
महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद शाळांमध्ये पुन्हा एकदा अंगणवाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांना आवश्यक सूचना दिल्या असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे बालकांना लहान वयातच शालेय वातावरणाची ओळख होणार असून, त्यांच्या मनात शिक्षणाबद्दल सकारात्मक भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच अंगणवाडी आणि प्राथमिक शिक्षण यांच्यातील दुवा अधिक मजबूत होणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
सध्या जिल्हा परिषदांच्या अनेक शाळांमध्ये काही वर्गखोल्या रिकाम्या असून, त्या सुस्थितीत आहेत. या उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करण्यासाठी अशा अतिरिक्त खोल्या अंगणवाड्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
www.konkantoday.com




