
६ महिन्यांच्या चिमुकल्याला सर्पदंश; डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात जीवदान
महाड तालुक्यातील गोटे बुद्रुक येथील अवघ्या सहा महिन्यांच्या बाळावर सर्पदंशानंतर वेळेत उपचार झाल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका यांच्या तत्परतेमुळे बाळाची प्रकृती सुधारून त्याला सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले.
सम्रान सागर गोलांबडे (वय ६ महिने) हे बाळ २३ मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घरी झोपलेले असताना अचानक रडू लागले. आई-वडिलांनी पाहणी केली असता बाळाजवळ फुरसे जातीचा विषारी साप आढळून आला. बाळाच्या डाव्या काखेजवळ दंशाची खूण, रक्तस्त्राव आणि सूज दिसून आल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालय, महाड येथे दाखल केले.
प्राथमिक तपासणीत सर्पविषामुळे रक्तविषारी परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी बाळाला बी.के.एल. वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे हलविण्यात आले.
रुग्णालयात दाखल होताच बाळाला अतिदक्षता विभागात ठेवून तातडीने सर्पविष प्रतिबंधक उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या अँटी स्नेक व्हेनममुळे विषाचा प्रभाव नियंत्रणात आला. सतत निरीक्षण आणि उपचारांमुळे बाळाची प्रकृती हळूहळू सुधारली आणि अखेरीस त्याला पूर्णपणे स्थिर अवस्थेत डिस्चार्ज देण्यात आला.
या उपचार प्रक्रियेत डॉ. अनिल कुर्णे, डॉ. अंकिता सुर्वे, डॉ. मोहित कडू, डॉ. विशाखा संकपाळ, डॉ. पंक्ति मेहता, डॉ. स्वप्नील काळे, डॉ. प्रतीक गोडसे, डॉ. विवेक सूर्यवंशी, डॉ. प्रिया वाघमारे, डॉ. विवेक पवार, डॉ. प्रणय गावंडे आणि डॉ. अजय पाटील यांनी विशेष योगदान दिले.




