३८ वर्षांनी पुन्हा दुमदुमणार शाळेची घंटा… १९८८ च्या विद्यार्थ्यांचे ५ वे स्नेहसंमेलन


श्रीमती आर. पी. पालशेतकर विद्यालय, पालशेत येथील एस.एस.सी. मार्च १९८८ बॅचच्या विद्यार्थ्यांचे ५ वे स्नेहसंमेलन रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत विद्यालय परिसरात हा भावनिक आणि प्रेरणादायी मेळावा पार पडणार आहे.

३८ वर्षांनंतर शाळेची घंटा पुन्हा वाजणार, “सरत्या वयाच्या सांजवेळी जीवनाचा अर्थ शोधताना” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहसंमेलनात जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या बॅचमधील विद्यार्थी आज अभियांत्रिकी, विधी, बँकिंग, शिक्षण, प्राध्यापक, शिक्षक, शेती तसेच उद्योग व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असून समाजात आपापले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

या बॅचची यापूर्वी १९९५, १९९७, २०११ आणि २०२२ मध्ये अशी चार स्नेहसंमेलने यशस्वीरीत्या पार पडली आहेत. २०२६ मधील हे ५ वे स्नेहसंमेलन विशेष उत्साहात आयोजित करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, शालेय ऋणाची जाणीव ठेवत या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सन २०१५ मध्ये विद्यालयाच्या भौतिक गरजांसाठी पुढाकार घेत संपूर्ण शाळेच्या इमारतीस सुमारे रु. ३ लाख खर्च करून रंगकाम करून दिले होते. त्यामुळे या बॅचबद्दल परिसरात विशेष गौरव व्यक्त केला जात आहे.

स्नेहसंमेलनात प्रार्थना, जुने मित्र-मैत्रिणींचा सन्मान, आठवणींना उजाळा, मैत्री भोजन, गप्पा-गोष्टी तसेच भावनिक अनुभवांची देवाणघेवाण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमास एस एस सी मार्च १९८८ च्या ब्याचचे सर्व माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button