
संजय राऊत यांचं वक्तव्य; “ज्यांना रामरक्षा पाठ आहे तेच चोर निघाले, देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला सल्ला देण्यापेक्षा…”
अयोध्येतील राम मंदिरातल्या दानपेटीच्या चोरी प्रकरणावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी रामरक्षा आंदोलनाबाबत माध्यमांशी संवाद साधला. रामरक्षा पाठ असणाऱ्यांनीच दानपेटी चोरली आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
तसंच आम्ही जे आंदोलन करणार आहोत ते आंदोलन हे राजकीय नाही, तर राम ही आपली राष्ट्रीय अस्मिता आहे. मंदिर व्हावं म्हणून देशाने लढा दिला आहे असंही राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही सगळ्यांना यासाठी आमंत्रित करु. संघाच्या लोकांनाही आम्ही बोलवू. देवेंद्र फडणवीस १८ जुलैला जर नागपूरमध्ये असतील तर त्यांनीही यावं कारण राम हा राजकीय विषय नाही. सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. नागपूर देशाची उपराजधानी आहे त्यामुळे आम्ही इथे आंदोलन करणार आहोत असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले संजय राऊत?
“नागपूरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही रामरक्षा आंदोलन करणार आहोत. मुंबईत त्याची सुरुवात झाली होती. आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या ३६ जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरे पोहचणार आहेत. कारण अयोध्येच्या राम मंदिरात आणि इतर अनेक प्रमुख मंदिरांमध्ये ज्या पद्धतीने लूटमार सुरु झाली आहे तेच कारण आहे. राम मंदिरातल्या दानपेट्या चोरीला गेल्या आहेत. लोकांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे. राम ही काही कुणाचीही मक्तेदारी नाही. अशा वेळी जे घडलंय त्याची खंत ना खेद. आज मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्टेटमेंट मी पाहिलं आहे. कारण आज संघाने बेळगावच्या बैठकीत खेद व्यक्त केला आहे. हे प्रकरण तेवढ्यावर थांबणार नाही. अजून मुख्य आरोपी बाहेर आहेत त्यांना वाचवलं जातं आहे.” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
ज्यांना उत्तम रामरक्षा येते अशाच लोकांनी लूट केली आहे – संजय राऊत
दरम्यान आज देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरेंनी दोन पानं रामरक्षा वाचून दाखवणार असतील आणि त्यांची हरकत नसेल तर मीदेखील रामरक्षा म्हणायला तिकडे जाईन असं म्हणत टोला लगावला होता. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, ज्यांना उत्तम रामरक्षा येत होती तेच राम मंदिराच्या दानपेटीचे चोर निघाले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सल्ला देण्यापेक्षा चोरांवर कारवाई केली पाहिजे. कारण त्यातले काही चोर हे महाराष्ट्रातले आहेत. माझा कुणाकडे इशारा नाही. रामरक्षा ज्यांना उत्तम येते अशाच लोकांनी ५५० कोटींची दानपेटी लुटली येते. जे सगळी मंदिरं लुटत आहेत त्या सगळ्यांना उत्तम रामरक्षा म्हणता येते असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.




