
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातर्फे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन
रत्नागिरी : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे औचित्य साधून या रुरल कम्युन्स या ही चिपळूणस्थित स्वयंसेवी संस्थेतील २९ महिलांना रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैद्यानिक अधिकारी व प्रमुख डॉ. केतनकुमार चौधरी यांनी खेकडा पालन, शोभिवंत मत्स्य पालन आणि मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ निर्मिती याविषयी मार्गदर्शन केले.
दरवर्षी ११ मे रोजी भारतात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. विज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा गौरव करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. आधुनिक युगात तंत्रज्ञान हे केवळ सुविधा निर्माण करणारे साधन नसून देशाच्या विकासाचे प्रमुख बळ बनले आहे. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेले रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र हे मत्स्य उद्योग क्षेत्रात गेले ४ दशक कार्यरत आहे. इथे संशोधन करून तयार करण्यात आलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण, मेळावा व कार्यशाळा राबविण्यात येत असतात. ‘रुरल कम्युन्स’ ही चिपळूण येथे स्थित एक स्वयंसेवी संस्था आहे, जी अल्पभूधारक शेतकरी, महिला आणि युवक यांसारख्या उपेक्षित ग्रामीण समुदायांच्या शाश्वत विकासासाठी समर्पित आहे. महाराष्ट्राच्या कोकण विभागात कार्यरत असलेली ही संस्था, हवामान-अनुकूल शेती, जलसंधारण आणि नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन यांद्वारे स्थानिक उपजीविका बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करते.
यावेळी झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातील प्रा. डॉ. आसिफ पागरकर, डॉ. मनोज घुघुस्कर, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीम. वर्षा सदावर्ते व अपूर्वा सावंत उपस्थित होते.



