सलग १५ व्या वर्षी कोकण बोर्ड महाराष्ट्रात अव्वल!


९४.१४ टक्के निकालासह रत्नागिरी-सिंधुदुर्गचा दबदबा कायम; मुलींनी पुन्हा मारली बाजी


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ९४.१४ टक्के निकाल लावत कोकण बोर्डाने सलग १५ व्या वर्षी राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. विशेष म्हणजे, २०१२ मध्ये या स्वतंत्र बोर्डाची स्थापना झाल्यापासून अव्वल स्थान टिकवून ठेवण्याची ऐतिहासिक परंपरा यंदाही कायम राखण्यात बोर्डाला यश आले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये परीक्षेचे वातावरण उत्साही आणि प्रामुख्याने कॉपीमुक्त राहिले, हे या निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले आहे.

यंदाच्या निकालातही दरवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येत आहे. कोकण विभागातून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.७८ इतकी असून मुलांची टक्केवारी ९१.५३ आहे. म्हणजेच मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ५.२५ टक्क्यांनी अधिक आहे. जिल्ह्यातील निकाल पाहिल्यास, सिंधुदुर्ग जिल्ह्याने ९५.९४ टक्के निकालासह बाजी मारली आहे, तर रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९३.१८ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात २.६ टक्क्यांची किंचित घट झाली असली, तरी राज्यातील इतर नऊ विभागांच्या तुलनेत कोकण बोर्डाने आपले अव्वल स्थान अढळ ठेवले आहे.

बोर्डाच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘कॉपीमुक्त अभियान’ आणि सीसीटीव्ही निगराणीखालील परीक्षा या उपक्रमांमुळे केंद्रांवर एकही गैरप्रकार घडला नाही. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाचाही या यशात मोठा वाटा आहे. या यशाबद्दल विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना नव्या उमेदीने यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

निकाल एका नजरेत (कोकण विभाग)

एकूण निकाल ९४.१४ %
सिंधुदुर्ग जिल्हा ९५.९४ %
रत्नागिरी जिल्हा ९३.१८ %
मुलींचा निकाल ९६.७८ %
मुलांचा निकाल ९१.५३ %
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी २१,५४८

शाखानिहाय निकालाचा टक्का

कोकण बोर्डात यंदाही विज्ञान शाखेने आघाडी घेतली असून या शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.५३% लागला आहे. त्यापाठोपाठ व्यावसायिक शिक्षण शाखेचा निकाल ९४.१३%, वाणिज्य शाखेचा ९३.९२% आणि कला शाखेचा निकाल ८८.६२% इतका लागला आहे. तंत्रज्ञान (Technical Science) शाखेचा निकाल ८६.८८% इतका राहिला आहे.

गुणपडताळणी कधी?

ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे, ते ३ मे ते १७ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. पुनर्मूल्यांकनासाठी आधी छायाप्रत घेणे अनिवार्य असून त्यानंतर विहित मुदतीत अर्ज करणे आवश्यक असल्याचे बोर्डाकडून कळवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button