लोकनेते आर. व्ही. बेलोसे यांचे कार्य हे आदर्श राजकारणाचे उत्तम उदाहरण : अस्मिता केंद्रे

४० व्या स्मृतिदिनानिमित्त दापोलीत आदरांजली : ‘मंदार’ वार्षिक अंकाचे प्रकाशन

दापोली : “लोकनेते आर. व्ही. बेलोसे यांचे कार्य हे आदर्श राजकारणाचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांमुळे अनेकांना राजकीय दिशा मिळाली. स्वच्छ विचार आणि प्रामाणिक राजकारणाच्या जोरावर समाजासाठी मोठे कार्य उभे करता येते,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी केले.

लोकनेते रामचंद्र विठ्ठल बेलोसे यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त न. का. वराडकर कला, रा. वि. बेलोसे वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ, शांतीलाल जैन विज्ञान कनिष्ठ आणि इंदुमती यादव माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने २ मे रोजी सांस्कृतिक सभागृहात आदरांजली कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही नमूद केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बाबुरावजी बेलोसे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी बाबुरावजींच्या कार्याचा गौरव करत सांगितले की, त्यांनी अर्थसंचय न करता लोकसंचयाचे कार्य केले आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थाने ‘लोकनेते’ ठरले. त्यांनी रुजवलेले शिक्षणाचे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे.
यानंतर महाविद्यालयाच्या ‘मंदार’ वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यकारी संपादक डॉ. बाबासाहेब गुंजाळ यांनी अंकाच्या परंपरेविषयी माहिती देत संपादकीय मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.
संस्थेचे कार्यवाह डॉ. दशरथ भोसले यांनी बाबुरावजींसोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचे स्मरण केले. अध्यक्षीय भाषणात धनंजय लक्ष्मणराव यादव यांनी बाबुरावजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे दापोलीसह कोकणच्या विकासाला चालना मिळाल्याचे नमूद केले आणि त्यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सुनीता बेलोसे, जानकी बेलोसे, मधुकर दळवी, कासम मालदार, परशुराम दळवी आदींनीही आपल्या भावना व्यक्त करत बाबुरावजींच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. एस. एस. खताते व मानसी कोवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. एल. पी. पाटील यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button