
रासायनिक अपघात (आपत्ती नियोजन, तयारी व प्रतिसाद) नियम 1996 अंतर्गत गठीत जिल्हा अरिष्ठ समुह बैठक
*रत्नागिरी, – जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात रासायनिक अपघात (आपत्ती नियोजन, तयारी व प्रतिसाद) नियम 1996 अंतर्गत गठीत जिल्हा अरिष्ठ समुह बैठक जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली.
यावेळी पोलीस उपअधिक्षक राधिका फडके, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक पी.आर.भितांडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्रिय अधिकारीपी.एस. कनवाजे, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे डॉ. विकास कुमरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, नियुक्त केलेल्या व्यक्तींना प्रत्यक्ष जे काम करावयाचे आहे त्याचे प्रशिक्षण वेळोवेळी द्यावे. अपघात होऊच नये यासाठी आवश्यक ती खबरदारी द्यावी. सर्व कंपन्यांनी नियमित मॉक ड्रील घ्यावी. आपत्तीला सामोरे जाण्यासाठी असलेल्या साधनसामुग्रीची तपासणी करावी. काही त्रुटी असल्यास त्या वेळीच दुरुस्त कराव्या किंवा त्या सुधाराव्यात. महामार्गावर होणाऱ्या रासायनिक अथवा गॅस वाहून नेणाऱ्या वाहनांच्या अपघातावेळी प्रतिसादासाठी संबंधितांनी तात्काळ उपलब्ध होणे आवश्यक आहे. रासायनिक अपघात प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कंपन्यांचा सर्वे करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक श्री.भितांडे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे मॉक ड्रील, प्रशिक्षण, ऑनसाईट इमरजेंसी प्लॅन,कंपन्यांमधील सुरक्षितता आदीबाबत माहिती दिली.




