रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय टेरेस वाचनालय संकल्पना घेऊन सुट्टीत बाळ गोपाळांना ग्रंथमित्र करण्याचा उपक्रम राबविणार- अॅड. दीपक पटवर्धन


शाळांच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. बालगोपाळ सुखाचा मनमुराद आनंद लुटत आहेत. त्यांच्या या आनंदात भर घालण्यासाठी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय बालगोपाळांसाठी पुस्तक खजिना उपलब्ध करुन देणार आहे.
रत्नागिरीतील हौसिंग सोसायट्या, वाड्या-वस्त्या या मध्ये त्या-त्या ठिकाणची मुलांची संख्या लक्षात घेऊन त्या-त्या हौसिंग सोसायटीत, वाडीत किंवा वस्तीत मुलांचे ग्रंथमित्र ग्रृप तयार करुन त्याची वाचनालयात नोंद करुन त्या ग्रृपला बाल वाचन साहित्य, पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वाचनालयाने घेतला आहे. दि. 10 मे 2026 ते दि.10 जून 2026 या कालावधीत आमच्या ग्रंथालयाचा हा उपक्रम बालवाचकांसाठी सुरु राहील.

ग्रंथालयात नोंद करणा-या अशा ग्रृपला त्यातील बालवाचकांच्या संख्येनुसार गोष्टीरुप पुस्तके उपलब्ध करुन दिली जातील. ही उपलब्ध करुन दिलेली पुस्तके वाचून झाली की पुन्हा दुसरी पुस्तके बदलून दिली जातील. या उपक्रमात सहभागी होऊन  बालवाचकांनी एकत्र बसुन वाचनाचा आनंद लुटावा अथवा ते शक्य नसल्यास ती आपल्या घरी नेऊन वाचावीत व ती वाचून झाली की पुस्तकात काय वाचलं हे एका स्वतंत्र वहीत नोंद करुन ठेवावी. उपक्रमाची मुदत संपतेवेळी या वह्या वाचनालयाकडे सादर कराव्यात. या नोंदवहीतील नोंदींचा आढावा घेऊन बक्षीस जाहिर केलं जाईल. मात्र या नोंदी मुलांनी स्वतः केलेल्या व स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या असाव्यात. 

वाचनालयामध्ये मुलांसाठी भरपूर बालसाहित्य उपलब्ध आहे. मुलांनी वाचाव्यात अशा अनेक मराठी, इंग्रजी पुस्तकांच्या सिरीज उपलब्ध आहेत. ज्यामध्ये हॅरी पॉटर, फास्टर फेणे, फेमस फाईव्ह समावेश आहे. त्याच बरोबरच लहान गोष्टींच्या स्वरुपातील थोर व्यक्तित्व, समाजसुधारक यांचा परिचय करुन देणारी पुस्तके, चातुर्यकथा, युध्द कथा, साहसकथा तसेच 1695 स्मार्ट रोबो-ए आय आणि औरंगजेब यासारखी विज्ञानाची, AI बाबतची जिज्ञासा वाढवणारी पुस्तके असा मुबलक ग्रंथखजिना ग्रंथालयात बालवाचकांची वाट बघत आहे. 

वरील उपक्रमाबरोबरच जवळपासच्या मुलांसाठी सकाळी 9.30 ते 12 व दुपारी 4 ते 6 या वेळेत मोफत वाचनालय सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी मुलांना प्रशस्त बसून वाचता यावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ही मुलेही वरील उपक्रमातील नोंदवही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत. त्यामुळे या सुट्टीत मुलांनी वाचनालयात येऊन आपल्या आवडीची पुस्तके मनसोक्त वाचावीत व त्यावर व्यक्त व्हावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button