
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दापोलीतील आई-मुलीचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दापोलीतील आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले. पोलादपूर हद्दीतील हॉटेल बालाजीजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला कारची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल रावसाहेब मार्केड हे आपल्या कुटुंबासह कारने महाडकडून दापोलीच्या दिशेने प्रवास करत होते. हॉटेल बालाजी परिसरात त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या कंटेनरवर मागून आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला.
या दुर्घटनेत सुवर्णा मार्केड आणि अनुक्षी अनिल मार्केड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अनिल मार्केड आणि चिन्मय मार्केड हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कार कंटेनरखाली अडकल्याने जेसीबीच्या मदतीने ती बाहेर काढण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने पोलिसांनी जखमींना आणि मृतदेहांना वाहनातून बाहेर काढले.
जखमींना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर अनिल मार्केड यांना पुढील उपचारासाठी माणगाव येथे हलविण्यात आले असून, चिन्मय याच्यावर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलादपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.




