मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची आडिवरेला भेट; तावडे अतिथी भवन व महाकाली मंदिरास दर्शन


मुंबईच्या महापौरपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच सौ. रितू तावडे यांनी आपल्या मूळ गावी आडिवरे येथे भेट दिली. या वेळी तावडे वाड्यात झालेल्या पारंपरिक स्वागताने आणि ग्रामस्थांच्या आपुलकीच्या स्नेहाने वातावरण भावुक झाले.

क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळातर्फे त्यांचे औपचारिक व पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. महापौर म्हणून गावच्या लेकीचे स्वागत करण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारंपरिक औक्षण, आपुलकीने केलेली विचारपूस आणि ग्रामस्थांकडून मिळालेल्या आशीर्वादामुळे सौ. रितू तावडे भावुक झाल्या. त्यांच्यासमवेत पती राजेश तावडे, मुलगा यश तावडे उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, “दिवसभर जनसामान्यांचे प्रश्न, बैठका आणि विकासकामांचा धडाका यामध्ये मन आणि शरीर दोन्ही गुंतलेले असते. आज तावडे अतिथी भवनास सहकुटुंब भेट दिल्याने मनाला एक वेगळीच उभारी मिळाली. येथे श्री सप्तकोटीश्वर आणि श्री महाकालीचे आशीर्वाद घेतले. या आशीर्वादामुळे जनसेवेसाठी अधिक बळ मिळेल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

तावडे अतिथी भवन येथे वास्तव्यास असताना त्यांनी कुलदैवत श्री सप्तकोटीश्वराच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतले. भवनाच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या कामाची माहिती त्यांनी आर्किटेक्ट संतोष तावडे यांच्याकडून जाणून घेतली.

या भेटीबाबत आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, मुंबईसारख्या महानगराच्या महापौरपदी विराजमान असूनही आपल्या मुळांशी, समाजाशी आणि कुलदैवतांशी असलेली त्यांची आत्मीयता अत्यंत प्रेरणादायी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button