मासेमारी हंगाम अखेरच्या टप्प्यात; बोटी किनाऱ्यावर, जाळ्यांची आवराआवर सुरू


रत्नागिरी : पावसाळ्याची चाहूल लागताच समुद्राचे रूप बदलू लागले असून, त्यासोबतच कोकणातील गजबजलेला मासेमारी हंगामही आता समाप्तीकडे झुकला आहे. आभाळात दाटून येणारे काळे ढग, वाढणारा वाऱ्याचा वेग आणि समुद्रातील उंचावणाऱ्या लाटा यामुळे मच्छीमारांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या मच्छिमारी बोटी किनाऱ्यावर आणण्यास सुरुवात केली आहे.
रत्नागिरी शहरालगतच्या चंपक मैदान परिसरात सध्या वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. वर्षभर समुद्रात मासेमारीसाठी वापरण्यात येणारी विशाल जाळी सुकवण्यासाठी कातळावर पसरवण्यात आली आहेत. भर उन्हात ही जाळी व्यवस्थित सुकवून त्यांची घडी घालण्याचे काम खलाशी करत आहेत. त्यानंतर ही जाळी ट्रकमधून सुरक्षित गोदामांमध्ये हलवली जात आहेत.
पावसाळ्यात ओलाव्यामुळे लाखो रुपये किमतीची जाळी खराब होऊ नयेत, यासाठी मच्छीमारांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात सध्या जाळी आवरणे, बोटी बांधून ठेवणे आणि साहित्य सुरक्षित स्थळी हलवणे अशी लगबग सुरू झाली आहे.
वर्षभर समुद्राशी झुंज देणाऱ्या मच्छीमारांसाठी हा काळ काहीसा दिलासादायक असला, तरी पुढील काही महिन्यांच्या विश्रांती आणि उदरनिर्वाहाची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button